वांग – मराठवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; ‘या’ 4 तालुक्यांतील शेतकऱ्यांना होणार लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड, पाटण व सांगली जिल्ह्यातील कडेगाव व खानापूर तालुक्यांना वरदान ठरलेल्या वांग- मराठवाडी धरणातून कालपासून वांग नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने पाटबंधारे विभागाकडून हा निर्णय घेतला असून, या हंगामातील हे पहिले आवर्तन आहे.

पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश न करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत. मराठवाडी धरणाचे बांधकाम २७ वर्षांनंतर पूर्णत्वाकडे आहे. २.७३ टीएमसी क्षमतेच्या धरणात आगामी पावसाळ्यात पूर्ण पाणीसाठा करण्यात येईल, असा अंदाज आहे. गेल्या पावसाळ्यात धरणाचे दरवाजे खुले ठेवले होते. मात्र, लाभक्षेत्राला आगामी सहा-सात महिने पुरून उरेल एवढा पाणीसाठा धरणात सध्या शिल्लक आहे.

सध्या रब्बी हंगामासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होऊ लागल्याने पाटबंधारे विभागाने आजपासून त्याबाबत कार्यवाही केली. मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात कराड व पाटण तालुक्यांमध्ये धरणातून सोडलेले पाणी अडवायला वांग नदीवर दहा बंधारे बांधलेले आहेत. बंधारे अडवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिल्यानंतर गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास धरणातून पाणी सोडायला सुरूवात केली. तत्पूर्वी धरणावरील सायरन वाजवून आजूबाजूच्या गावांत नदीपात्रात गेलेल्या सावध करण्यात आले.