सातारा जिल्ह्यातील धरणांतून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प काठापर्यंत भरले असून त्यामध्ये १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे. तसेच आठवड्यापासून कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे. या धरणांतील पाण्यावर सातारा तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे पावसाळ्यात धरणे भरली की पुढील नऊ महिने चिंता करण्याचे कारण नसते. त्यातच यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झाले.

या पावसामुळे प्रमुख धरणांबरोबरच छोटे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत चिंतेचे कारण राहिलेले नाही. जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामातील पिके चांगली आलेली आहेत. त्यामुळे सध्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे. यासाठी धरणांतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील सध्या धोम, कण्हेर, कोयना आणि उरमोडी या धरणांतून पाणी सोडले जात आहे. तर सध्या कोयना धरणात अजूनही १०० टीएमसीवर पाणीसाठा शिल्लक आहे. तर धोममध्ये १२.५९ टीएमसी, कण्हेरमध्ये ९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.

गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उरमोडी धरणात जेमतेम सहा टीएमसीच पाणीसाठा झाला होता; पण यंदा धरण भरून वाहिले. त्यातच अजूनही धरण काठोकाठ आहे. या धरणावरच दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांतील सिंचन योजना अवलंबून आहेत. यंदा कोयना धरणही भरल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे. सांगलीसाठी १०५० क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील धोम धरणातून सध्या ७०५, कण्हेर धरणाच्या डावा आणि उजवा कालव्याद्वारे ४७५ क्युसेक पाणी विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे. तर उरमोडी धरणातून १५० क्युसेक पाणी विसर्ग नदीद्वारे सोडण्यात आलेला आहे. हे पाणीही सिंचनासाठी जात आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. हे पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचन तसेच इतर कारणांसाठी सोडण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार आहे.