पाटण प्रतिनिधी । एप्रिल महिन्यातच सांगली जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यामुळे येथील सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून विमोचक द्वारमधून आता १२०० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता पायथा वीजगृह आणि विमोचक द्वार असा मिळून ३ हजार ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात सध्या ४३ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
सुमारे १०५.२५ टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते. वीज निर्मितीबरोबरच सिंचन आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठीही धरणातून पाणी सोडले जाते. यामध्ये सांगली जिल्ह्याती अधिक करुन सिंचन पाणी योजनांचा समावेश आहे. गेल्यावर्षी सातारा जिल्ह्यात अपुरे पर्जन्यमान झाल्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिले. परिणामी कोयना धरण भरले नव्हते.
कोयना धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच गेल्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. मागणी आणि तरतुदीनुसार सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील ५ महिन्यांपासून हे पाणी सांगलीकडून जसजशी मागणी केली जाईल तसतसे सोडले जात आहे.
सकाळी धरणाच्या विमोचक द्वारमधील विसर्ग १२०० क्यूसेकपर्यंत वाढ
दरम्यान, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची वारंवार मागणी केली जात असल्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजता धरणाच्या विमोचक द्वारमधील विसर्ग ९०० वरुन १२०० क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामधूनही २१०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी ३ हजार ३०० क्यूसेक पाणी विसर्ग होत आहे. हे सर्व कोयना नदीतून पुढे जात आहे.
कोयना धरणात ४०.७९ टक्के पाणीसाठा
दरम्यान, कोयना धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास ४२.९३ टीएमसी पाणीसाठा होता. अजुनही कोयना धरणात ४०.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दि. 1 जूनपर्यंत कोयना धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.