पाटण प्रतिनिधी | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार पुनरागमन केलंय. कोयना धरणातील पाणीसाठा १०० टीएमसी झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नुकतेच धरणाचे सहा दरवाजे सव्वा फुटाने उघडण्यात आले आहेत.
कोयना धरण पाणलोट पावसानं दमदार कमबॅक केलं आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा १०० टीएमसी झाला आहे. दरम्यान, पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटाने उघडून प्रतिसेकंद १२,४५५ क्युसेक्स वेगाने कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील उद्योगविश्वाची चिंता मिटली
कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यरेषा आणि उद्योग विश्वाचा कणा मानलं जातं. कोयना धरणातील पाणीसाठ्यानं १०० टीएमसीचा टप्पा गाठल्यानं उद्योगविश्वाची वीजेची चिंता मिटली आहे. कोयनेच्या पाण्यावर तयार होणारी वीज उद्योगांना पुरवली जाते. धरण भरल्यानं आता पूर्ण क्षमतेनं वीजनिर्मिती होणार आहे. परिणामी, उद्योगांसाठी अखंडीत वीजपुरवठा होऊ शकणार आहे.
सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागणार
कोयना धरणातून पूर्वेकडील सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी पाणी सोडलं जातं. धरण भरल्यानं कोयना, कृष्णा नदीकाठच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. ऐन उन्हाळ्यात कोयनेच्या पाण्यामुळं टंचाई सुसह्य होण्यास मदत होते.
धरणातून पाणी सोडल्यानं सतर्कतेचा इशारा
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सायंकाळी सव्वा फुटाने उघडण्यात आले आहेत. तसेच पायथा विद्युतगृहाची दोन्ही युनिट कार्यान्वित करण्यात आली आहे. १२,४५५ क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद ४१ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत आहे.