सातारा प्रतिनिधी | अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस बरसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस शांत स्वरूपात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाने मात्र रौद्ररूप धारण केलेले असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे राज्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे. पावसाचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली या ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असणार आहे. त्याचप्रमाणे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढ झालेली आहे. विदर्भापासून ते मुंबई पर्यंत देखील खूप जास्त तापमान वाढ झालेली दिसत आहे. परंतु आता परतीचा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडावा पसरणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 सेल्सिअस असणार आहे. या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे.