पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या माध्यमातून कराड,पाटण, सगळी जिल्ह्यास पाणीपुरवठा होतो. तसेच पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी विभागातील वांग मराठवाडी धरणाद्वारेही परिसरात शेतीक्षेत्रास पाणी पुरवले जाते. एकूण पाणीसाठवण क्षमता 2.73 टीएमसी असलेल्या वांग मराठवाडी धरण हे आता 73 टक्के भरले आहे. धरणात 56.576 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा झाला असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यातून प्रतिसेकंद 361 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अत्यल्प पाऊस झाल्याने हे धरण 73 टक्के भरण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला आहे. तसेच या धरणाची काही कामे अजूनही प्रलंबित असल्याने यंदा धरणात यापेक्षा जादा पाणी साठा केला जाणार नाही, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्याच्या वतीने देण्यात आली आहे. मागील वर्षी धरणाची प्रलंबित कामे असल्याचे कारण देत मागणी नसतानाही ऑक्टोबरमध्ये धरणातील बहुतांश पाणी सोडून देण्यात आले होते.
तर उर्वरित पाणी राखीव ठेवण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागून लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या पिकांना पाणी मिळू शकले नव्हते. पाणी न मिळाल्यामुळे यंदा मागणी नसताना पाण्याचा विसर्ग केला जाऊ नये,अशी मागणी धरण क्षेत्रातील स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.