वांग, उत्तरमांड प्रकल्पग्रस्तांच्या मागणी संदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करा; मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या विभागास सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशतः बाधित मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रक्कमेबाबत, तारळी प्रकल्पात १०० टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाह भत्ता आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पामुळे अंशतः बाधित झालेल्या माथनेवाडी येथील ४६ घरांच्या पुनर्वसनासाठी संबधित विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज दिल्या.

मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशतः बाधित गाव मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रस्तावाबाबत, तारळी प्रकल्पामध्ये १००% जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ करण्याबाबत आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पामुळे अंशतः बाधित झालेल्या माथनेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसन प्रस्तावबाबत बैठक झाली. बैठकीस जलसंपदा व पुनर्वसन विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते. तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, उत्तर मांड मध्यम प्रकल्पामधील अंशतः बाधित झालेल्या माथनेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने नियामक मंडळामध्ये मान्यता घेऊन प्रस्ताव तातडीने सादर करावा. वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशतः बाधित मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या रोख रक्कमेबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने वित्त, विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायासह पाठवावेत. तर तारळी प्रकल्पात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाहसाठी येणारा खर्चाबाबतची वस्तुनिष्ठ माहिती सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने अभिप्रायासह तातडीने सादर करावी.

प्रकल्पग्रस्तांना देय असणारी मदत वेळीच मिळाली पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावना संवेदनशीलपणे जाणून घ्याव्यात व प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत दिल्या.