अनोळखी इसमाचा खून करुन ‘त्यांनी’ अपघाताचा केला खोटा बनाव, पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० ते ४५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून व त्याला बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना दि. १८ मे रोजी सुरूर ता. वाई येथे घडली होती. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

जक्कल रंगा काळे (वय ४५) (स्वतः), मक्शा रंगा काळे (वय ४०) (भाऊ), सोनु जक्कल काळे (वय १९) (मुलगा), संगीता जक्कल काळे (वय ४२) (पहिली पत्नी सर्व रा. सुरुर ता. वाई जि. सातारा) करण्यात आल्याची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीतील माळावरच्या झोपडपट्टीमध्ये दि. १८ मे रोजी वरील संशयितांनी अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका अनोळखी व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले.

दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. २३ रोजी सायंकाळी सहा वाजता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. भुईंज पोलिसांनी तपास केल्यानंतर हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला. परंतु त्या व्यक्तीची ओळख पटली नसल्याने पोलिस त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत असताना तपासामध्ये माळावरची झोपडपट्टी, सुरुर तसेच सुरुर गावातील १० ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे पाहून त्यामध्ये संशयीत इसम हे दि. १९/०५/२०२४ रोजी सकाळी एका मोटर सायकल वरुन दोघांचेमध्ये जखमीस बसवून घेऊन जात असलेचे दिसून आले.

त्यावरुन सदर मयताबाबत संशय निर्माण झालेने या अनुषंगाने तपास केला असता गोपनीय माहिती मिळाली की, त्यामध्ये सदरचा इसम हा अपघातात जखमी झालेला नसून त्यास पारधी आरोपी नामे जक्कल रंगा काळे याने त्याचे घरातील ३ लोकांसह मयताचे त्याच्या दुस-या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याचे डोक्यात दगड घालून जखमी केले होते व त्यानंतर त्यास सुरुर पुलाखाली आणुन टाकुन आरोपी नामे मक्शा रंगा काळे याने त्याचा मोबाईल नंबर ९६८९९५९४४१ वरुन डायल ११२ वर फोन करुन अपघाताचा खोटा बनाव केला होता. म्हणून सदर मयतेच्या तपासात भुईज पोलीस ठाणे गु.र.नं १८२/२०२४ भादविस कलम ३०२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व आरोपी जक्कल रंगा काळे, मक्शा रंगा काळे हे सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, श्री.बाळासाहेब भालचिम, श्री. अरुण देवकर यांनी सदरच्या गुन्हयातील आरोपी यांना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्हयातील आरोपी यांना पकडणेसाठी सपोनि रमेश गर्जे तसेच सपोनि रोहित फाणें यांच्य मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण शाखा, भुईज चे पथक तयार करण्यात आले होते.

सदर पथकाने आरोपीचे ठाव ठिकाण्याची माहिती काढून ३ पुरुष व १ महिला आरोपीस सुरुर परिसरातुन ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केलेचे सांगितलेने त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक केले आहे. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, श्री.बाळासाहेब भालचीम, श्री. अरुण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि रोहित फणें, पो.उप-नि.विशाल भंडारे, पोलीस अंमलदार वैभय टकले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगदणे, गणेश कापरे, संतोष संपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, अरुण पाटील, अमित संपकाळ, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, ओंकार यादव, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, अमृत कर्पे, प्रविण पवार, शिवाजी गुरव, म.पो.कॉ. भाग्यश्री जाधव, रुपाली शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.