पाटण प्रतिनिधी । 261 पाटण विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप मतदार जागरुकता उपक्रमांतर्गत प्रशासनातर्फे आज पाटणच्या आठवडी बाजारात मतदारांमध्ये मतदान जागृती करण्यात आली.
यावेळी निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवडी बाजारात जाऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. तसेच भाजी विक्री करणाऱ्यांना मतदानाचे महत्व पटवून सांगितले. जागरुक मतदार लोकशाहीचा अंगरक्षक, भविष्याची कल्पना करा आणि योग्य पध्दतीने मत द्या, चला मतदान करुया, देशाची प्रगती घडवू या अशा आशयाचे फलक घेऊन पाटण आठवडी बाजारात कर्मचाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली.
यावेळी बाजारात खरेदीसाठी आलेल्या पुरुष व महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली. तसेच मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मतदान प्रक्रिया समजून देखील घेतली.