मल्हारपेठ कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा ग्रामसभेत इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | मल्हारपेठ येथे ग्रामस्थांची ग्रामसभा नुकतीच पार पडली. यावेळी मल्हारपेठचे सरपंच किरण दशवंत ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. या ग्रामसभेत अनेक महत्वाचे ठराव करण्यात आले तसेच यावेळी मल्हारपेठ कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय असे नामकरण करण्याचा एकमुखी ठराव, तसेच प्रवेशद्वारास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचाही एकमुखी निर्णय व छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा मेघडंबरी पुतळा उभारण्याचाही ठराव येथील ग्रामसभेत घेण्यात आला. दरम्यान, कृषी सहायक मिळत नसेल, तर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले यावेळी १५ व्या वित्त आयोगातून २०२४- २५ मध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण यावर होणाऱ्या खर्चाचे वाचन केले. प्रधानमंत्री आवास योजना यादी वाचन करून लाभार्थ्यांची नावे वाचून दाखवली. भाग्यश्री योजनेचा लाभ घेतलेल्या वीरा सागर सुतार यांना २५ हजारांचा धनादेश दिला. गावात पहिली मुलगी जन्माला आल्यावर तिच्या नावे दहा हजार रुपये अनामत ठेवण्याचा ठराव झाला. आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या स्णवाहिकेला ये जा करताना त्रास होत असल्याने भाजी मंडईमधील भाजी विक्रेत्यांना एका बाजूला बसण्याबाबत ठराव घेण्यात आला.

एसटी स्टॅण्ड परिसरात होत असलेल्या रिक्षा थांव्याबाबत इतरत्र जागा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झालो. गावामधील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा प्रकल्पाच्या अनुषंगाने निधी उपलब्ध झाल्यानंतर काम चालू होणार आहे. चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरी पुतळा बसण्याचा ठराव घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार करण्याचाही ठराव झाला.

ग्रामपंचायतीस लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय असे नामकरण करण्याबाबत ठराव एकमुखाने मंजूर झाला. प्राथमिक आरोग्य केंद्राची कुनी इमारत अस्ताव्यस्त पडली आहे. तिचे निर्लेखन करण्याचाही ठराव घेण्यात आला. यावेळी सुरेश पानसकर, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण, सूर्यकांत पानसकर, धीरज पवार, आरोग्य, पोलिस विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.