चक्क गावकऱ्यांनी आपल्या घरांना दिली फळे – फुलांची नावे…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । आपण एखादे नवे घर बांधले कि त्याची वास्तुशांती करून त्या घराला साजेसं असं नाव देतो. मग कुणी आईची कृपा, आई-वडिलांचा आशीर्वाद तर कुणी त्याला पटेल असे नाव देतो. मात्र, सातारा जिल्ह्यातील एक असं गाव आहे कि त्या गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत गावातील प्रत्येक घराला आपल्या आई वडिलांचे नाव न देता चक्क फळे, फुलांच्या वृक्षांची नावे दिली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी या गावातील ग्रामस्थांनी सर्वच घरांचा नामकरण सोहळा आज साजरा केला. या आगळ्यावेगळ्या नामकरण सोहळ्याची चांगलीच चर्चा मानेवाडीसह पंचक्रोशीत केली जात आहे.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील वांग नदीकाठच्या मालदन गावच्या उत्तरेला मान्याचीवाडी हे वसले एक गाव छोटसं गाव. गावात आजपर्यंत कोणत्याही प्रकारची निवडणूक झालेली नसून, सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने ग्रामविकासात नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे योगदान दिले आहे. या गावात विविध प्रकारच्या तीसवर देशी प्रजातींच्या सुमारे पाचशे वृक्षांचे रोपण घरासमोर करण्यात आले आहे. त्या वृक्षांची संपूर्ण माहितीही त्या घराच्या भिंतीवर आणि दरवाजांवर लावण्यात आली आहे.

नामकरण करण्यात आल्यानंतर आता मान्याचीवाडी गावातील घरांना एका खास अशा नावांनी ओळखले जाणार आहे. आंबा घर, चिकू घर, दालचिनी घर, काजू घर, पेरु घर, जांभूळ घर, आवळा घर, फणस घर, मोहगणी घर, चेरी घर, सीता अशोक घर अशी घरांना नावे मिळाली आहेत. मान्याच्यावाडीत आज सकाळी पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या नामकरण सोहळ्यास सदस्य उत्तमराव माने, दिलीप गुंजाळकर, लता आसळकर, निर्मला पाचपुते, सीमा माने, मनीषा माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, सर्जेराव माने, विठ्ठल माने, दादासोा माने आदींची दीं प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना काळात या मान्याचीवाडी गावातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये म्हणून गावातील घरांच्या भिंतीवर सामान्य ज्ञान, इतिहास, गणित आदि विषयांचे हजारो प्रश्न उत्तरे, गणितीय सूत्र, ऐतिहासिक माहिती लिहीण्यात आली होती. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना आणि विशेषतः अभ्यासकांनाही होत आहे.

मान्याचीवाडी गावात राबविलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’शी गावचे सरपंच रवींद्र माने यांनी संवाद साधला. यावेळी माने म्हणाले की, विदेशी वृक्षांचे आक्रमक शहरात होत असताना त्याची लागण ग्रामीण भागातही होऊ लागली आहे. यामुळे देशी वृक्षांबाबत दिवसेंदिवस दुरावा निर्माण होत आहे. यामुळे औषधी वनस्पतींसह मुळ देशी प्रजातींच्या वनस्पती दुर्मिळ होत आहेत. नव्या पिढीला अशा वनस्पती अथवा वृक्षांबाबत ओळख निर्माण व्हावी तसेच औषधी आणि ऑक्सिजन युक्त वृक्षांची गावागावात मोठ्या प्रमाणात लागवड आणि संवर्धन व्हावे यासाठीच हा प्रयत्न असल्याचे सरपंच रवींद्र माने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधताना म्हंटले.

30 हून अधिक जातींच्या वृक्षांची लागण…

यामध्ये आता गावकऱ्यांसह ग्रामविकासाच्या अभ्यासासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना देशी प्रजातींच्या वृक्षांची ओळख व्हावी तसेच देशी वृक्षांबाबत प्रेम निर्माण व्हावे यासाठी गावातील प्रत्येक घरासमोर आंबा, चिक्कू, दालचिनी, काजू, पेरू, जांभूळ अशा तीसवर जातींच्या वृक्षांची लागण करण्यात आली आहे. ज्या घरासमोर
ज्या जातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले आहे, त्या घराला त्या वृक्षाचे नाव देण्यात आले आहे. तसेच त्या वृक्षांचे फायदे, उपयोग, वनस्पती शास्त्रीय माहिती आदी बाबींचा बीं उल्लेख असलेले पोस्टर्सही वृक्षाशेजारी लावण्यात आले आहेत.

वृक्षलागवड आणि संवर्धन याची यशस्वी सांगड

राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी करत ग्रामविकासात दिशादर्शक ठरले आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत या गावाने भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर काम करत असताना वृक्षलागवड आणि संवर्धन याची यशस्वी सांगड घातली आहे.

तब्बल 200 घरांचे एकाचवेळी नामकरण…

पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावात १२८ कुटुंबे आहेत तर ४२५ लोकसंख्या आहे आणि २१२ घरांची संख्या आहे. या सर्वच घरांचा नामकरण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.

चक्क मिळकतीवरही होणार नोंदी…

ग्रामपंचायत मिळकतीवर आठ ‘अ’ च्या उताऱ्यावर वार्ड आणि खातेदारांच्या नावांचा आणि संबंधित वार्डाचा तसेच गल्लीचा उल्लेख असतो. मात्र आता मान्याचीवाडीतील खातेदारांच्या मिळकतीच्या उताऱ्यावरही घरांच्या नामकरणाचा उल्लेख होणार आहे.