अदानींच्या वीज प्रकल्‍प रद्द मागणीसाठी प्रकल्पग्रस्त थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | तारळे ता. पाटण येथे मंगळवारी प्रकल्पबाधित व श्रमिक मुक्ती दलाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी अदानी यांच्या वीज निर्मितीच्या प्रकल्पास विरोध दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. त्यापूर्वी मेळावा घेणार असल्याची घोषणा डॉ. पाटणकर यांनी यावेळी केली.

तारळे येथील मेळाव्यातून डॉ. पाटणकर म्हणाले की, तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कळंबे, डफळवाडी, तोंडोशी या ठिकाणी शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा अदानी ग्रुपचा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट रद्द करावा, जनसुनावणी रद्द करावी. या प्रकल्पामुळे बाधित होणारे प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी ता. ७ एप्रिल रोजी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहे. काही लोक विकासाला विरोध करू नका म्हणून सांगतात; परंतु आधीच तालुक्यातील धरणांमध्ये ज्यांनी जमिनी दिल्या. त्यांचे काय हाल झाले व होत आहेत. याचा विचार केला आहे का?’’ असा सवाल डॉ. पाटणकर यांनी उपस्थित केला.

या वेळी प्रशांत पवार, उत्तम मगर, राजाभाऊ जगधनी, प्रदीप निकम, भाऊसाहेब निकम, शंकर पन्हाळकर, जोतिराम जाधव, जोतिराम जाधव, खबाले बापू, अभिजित जाधव, सखाराम सपकाळ, ज्ञानदेव सपकाळ, भरत जाधव, आनंदा सपकाळ, जयसिंग पन्हाळकर, बाजीराव पन्हाळकर, शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

सातारा हा जिल्हा क्रांतिकारकांचा…

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘हा जिल्हा क्रांतिकारकांचा लढाऊ जिल्हा आहे. नाना पाटील, किसन वीर, दिनकरराव निकम या आणि अशा अनेक क्रांतिकारकांनी या जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. हा इतिहास विसरता कामा नये. हे सह्याद्रीचे पठार आम्ही उद्‌ध्वस्त करू देणार नाही. हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा आहे. त्यामुळे राजकीय पक्ष बाजूला ठेऊन जनतेने एकत्र लढा देऊन जनसुनावणी रद्द करून घेऊया, असे डॉ. पाटणकर म्हणाले.