पाटण प्रतिनिधी । भक्ष्याच्या शोधार्थ लोकवस्तीत आलेला बिबट्या घराबाहेर कट्टयावर भांडी घासत बसलेल्या महिलेच्या पुढ्यात उभा राहिल्याने एकच धावपळ उडाली. तळमावले (ता. पाटण) येथील धुमाळवाडीत काल रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूला धुमाळवाडी असून या वाडीच्या परिसरात बिबट्याचा वारंवार संचार होत असल्याचे दिसून आले आहे. काल रात्रीही येथील भरवस्तीत बिबट्या आल्याने त्याच्या डरकाळीचे आवाज वस्तीवरील काही लोकांना ऐकू आले. बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धुमाळवाडीतील एका घरात भाड्याच्या घरातील कुटुंबातील महिला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घराच्या पुढच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावर भांडी घासत बसलेली असताना अचानक तिच्यासमोर अवघ्या चार फूट अंतरावर झाडाच्या आडोशाला बिबट्या उभा असल्याचे ये- जा करणाऱ्या काही जणांनी पाहिले. त्यांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्या तेथून पसार झाला. संबंधित घराजवळ पिंजऱ्यात कुत्र्याचे पिल्लू ठेवल्याने त्याचा माग काढतच बिबट्या तेथे आला असावा, असा अंदाज ग्रामस्थांमधून वर्तवण्यात आला. दरम्यान, या बिबट्याचा वन विभागातील कर्मचाऱ्यानी तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ मंडळींकडून केली जात आहे.