सातारा प्रतिनिधी | एखादा प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आल्यास तो कामावर असताना त्याला त्याच्याकडे माहिती मागायला आल्यास ती देणे आवश्यक असते. मात्र, अनेकवेळा काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लोकांना माहितीच दिली जात नाही. नंतर त्याचा चांगला परिणाम त्या अधिकारी, कर्मचाऱ्यास सहन करावा लागतो. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये घडली. येथील ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांना माहिती अधिकाराअंतर्गत माहिती न दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी दणका देत 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शिरवळ ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून बबनराव धायगुडे हे कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते इम्रान उर्फ पप्पू कलाम काझी यांनी धायगुडे यांच्याकडे लेखी स्वरुपात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. माञ संबंधित माहिती धायगुडे यांनी न दिल्याने इम्रान उर्फ पप्पू काझी यांनी खंडाळा पंचायत समितीचे प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. यावेळी संबंधितांनी आदेश देऊनही ग्रामविकास अधिकारी धायगुडे यांनी माहिती न दिल्याने तक्रारदार यांनी पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांच्याकडे 20 डिसेंबर 2022 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.
राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी तक्रारदार इम्रान उर्फ पप्पू काझी यांचा दाखल केलेला तक्रारी अर्ज मान्य करीत ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांना माहिती न दिल्याप्रकरणी 25 हजार रुपयांचा दंड भरण्याचा आदेश सुनावला. तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित दंड मासिक वेतनातून वसुल करण्याचा आदेश दिला. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.