पाटण तालुक्यातील परिस्थिती भयानक, 1983 सारखी क्रांती करा – विक्रमसिंह पाटणकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । तांदूळ निवडताना तांदळातील खडा बाहेर फेकला जातो, तसं पाटण तालुक्याच्या निष्क्रिय नेतृत्वाला खड्यासारखं बाजूला फेकून १९८३ सारखी क्रांती करा, असं आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केलं.

पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक सहकारी संघाचं ‘विक्रमसिंह पाटणकर सहकारी दूध संघ’ नामकरण तसंच दूध संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, राजाभाऊ शेलार उपस्थित होते.

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले की, पाटण विधानसभा मतदार संघातील आजची राजकीय परिस्थिती भयानक आहे. तालुक्यात नुसता विकासाचा गवगवा सुरू आहे. त्यामुळे जनतेनं आता सावधपणे पावले टाकली पाहिजेत. निष्क्रिय नेतृत्वाला तांदळातील खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. ज्याप्रमाणे पाटण तालुक्यातील जनतेने १९८३ मध्ये उठाव केला होता. तसाच उठला करून तरूणांच्या भविष्यासाठी पुन्हा क्रांती घडवून आणली पाहिजे.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की, पाटण तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून उभ्या केलेल्या सर्व सहकारी संस्था चांगल्या प्रकारे सुरू आहेत. त्यामुळे दूध संघाची प्रगती कशी खुंटेल, यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. त्यांनाही आपण पुरून उरलो. शरद पवार यांनी पाटण तालुक्याला ताकद दिली. त्यामुळे पवार साहेबांच्या पाठीशी आपण ताकद उभी केली पाहिजे. आता ‘करो वा मरो’ची ही लढाई असून आपण त्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केलं.

हिंदुराव पाटील म्हणाले, पाटण तालुका सहकारी दुध संघाला दादांचे नाव देवून विक्रमसिंह पाटणकरांनी पाटण तालुक्यात केलेल्या विकासकामाला न्याय देण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. दूध संघाने तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थिक उन्नती साधली आहे.