सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अशाच एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील (Kas Plateau) एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही रेव्ह पार्टी (Rave Party) रंगली. रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांना ही रेव्ह पार्टी अदा केली. या रेव्हपार्टी दरम्यान झालेल्या भांडणात 3 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
साताऱ्यातील कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच एक रेव्ह पार्टी पार पडली. या रेव्ह पार्टीत बारबाला देखील नाचवल्या गेल्या असून पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे, बारबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशलमिडियावर व्हायरल होत आहेत. ही रेव्ह पार्टी असतानाच या ठिकाणी काही कारणांवरून वाद होऊन राडा देखील झाला. त्यामध्ये, तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
साताऱ्यातील रेव्ह पार्टीच्या या घटनेचे व्हिडिओ तीन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असून या प्रकरणाची कठोरपणे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. दरम्यान, याबाबत सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी मेढा आणि वाई पोलिसांना या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल; देखील सादर करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.