कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वनवासवाडी, कोळेकरवाडी गावानजीक असलेल्या सावांडा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रानगव्यांच्या कळपांचे ग्रामस्थांना दर्शन झाले. मुक्तपणे संचार करीत शेतीचे नुकसान करणाऱ्या रानगव्यांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे.
चाफळ विभागात डोंगरमाथ्यावर वनवासवाडी, कोळेकरवाडी गाव वसले आहे. या गावांच्या सावांडा नावाच्या शिवारामध्ये मंगळवारी भरदिवसा शेतकऱ्यांना रानगव्यांचे दर्शन झाले. पंधरा ते वीसच्या कळपाने आलेल्या रानगव्यांनी शिवारात सर्वत्र धुडकुस घालत होते. आठवडाभरात झालेल्या वादळी पावसाने शेतामध्ये पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना प्रारंभ केला आहे.
सध्या शेतात शेणखत टाकणे, दगडाच्या ताली रचणे, कचरा गोळा करणे याबरोबरच मशागतीची कामे केली जात आहेत. त्यामुळे शेतकरी उन्हाच्या कडाक्यामुळे सकाळी दहाच्या आत व दुपारी – चारनंतर शिवारात जात आहेत. मंगळवारी सकाळी शेतीची कामे करण्यासाठी शिवारात गेलेल्या शेतकऱ्यांना रानगव्याचे कळप दिसून आले. रानगव्याच्या काळपाना पाहताच शेतकऱ्यांची भंबेरी उडाली. दिवसाढवळ्या रानगवे शिवारात मुक्तपणे संचार करू लागल्याने शेतात मशागतीची कामे कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.