कराड प्रतिनिधी | गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाटण तालुक्यातील गमेवाडी – चाफळ येथील उत्तर – मांड धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. चाफळ विभागापासुन ते उंब्रज पर्यंतच्या जवळपास अडीच हजार एकर शेती सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान या वरदाई व महत्वकांक्षी ठरलेल्या गमेवाडी(चाफळ) येथील उत्तर-मांड मध्यम प्रकल्पामुळे दरवर्षी भागत असते.
सध्या पडत असलेल्या दमदार पावसामुळे हे धरण पुर्ण भरून वाहू लागले असल्याने या परिसरातील सर्व शेतकरी व इतर लोकांच्यामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याआधी येथील शेती ही कोरडवाहू शेती म्हणुन परिचित होती. पुर्वी या शेतजमिनीत खरिपाची व रब्बी हंगामातील सर्व कोरडवाहू पिके घेतली जात होती.
मुबलक जलाशय म्हणून प्रसिद्ध असलेला हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याने या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील हजारो एकर शेतजमीन सिंचनाने हिरवीगार बागायती शेती निर्माण करून अनेक शेतक-यांचे जीवनमान प्रगत केले आहे. या प्रकल्पापासुन ते उंब्रज पर्यंतच्या लाभ क्षेत्रात उत्तर-मांड नदीवर ठिकठिकाणी वरदाई असे अकरा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून लाभक्षेत्रातील शेतजमीन सुजलाम-सुफलाम केली आहे.
त्यामुळे अनेक शेतकरी आपआपल्या शेतीमध्ये आधुनिक व नवनवनवीन शेतीतंत्रज्ञान वापरून अनेक नगदी पिकांचे विक्रमी उत्पादन पिकवून आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत. सध्या पडत असलेल्या दमदार पावसामुळे या धरणांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथील शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी वरदाई मदत होणार आहे.