कराड प्रतिनिधी | कोल्हापूरहून पुण्याला एसटीने निघालेल्या महिलेकडील सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोरी प्रकाश निकम (रा. वृंदावन फेज २, सिटी प्राईड स्कूल, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथे राहणाऱ्या किशोरी निकम यांचे गडहिंग्लज तालुक्यातील बसरगी हे माहेर आहे. काही कामानिमित्त त्या माहेरी गेल्या होत्या.
बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून पुण्याला जाण्यासाठी त्या कोल्हापूर-स्वारगेट या एसटीमध्ये बसल्या. एसटीत बसताना त्यांनी दागिने व रोख रक्कम असलेली पर्स खांद्याला अडकवून स्वत:च्या मांडीवर ठेवली होती. त्यानंतर कोल्हापूर ते कराड यादरम्यानच्या प्रवासात काहीवेळ त्यांना झोप लागली. याचदरम्यान एसटी कराडजवळ कोल्हापूर नाका येथे आली असताना अचानक बिघाड झाल्यामुळे चालकाने एसटी महामार्गा नजीक थांबवली. तसेच बिघाड झाल्यामुळे एसटी पुढे जाणार नाही, असे सांगून वाहकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. किशोरी निकम यासुद्धा त्यांचे सर्व साहित्य घेऊन एसटीमधून खाली उतरल्या.
त्यानंतर वाहकाने किशोरी निकम यांना मालवण-निगडी या पर्यायी एसटीमध्ये बसवले. संबंधित एसटी कराडपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मुंढे, गोटे गावच्या हद्दीत पोहोचली असताना तिकीट काढण्यासाठी किशोरी यांनी त्यांची पर्स तपासली असता पर्समधील छोटे पाकीट त्यांना दिसले नाही. त्यामुळे त्यांनी पर्समधील साहित्य सर्व पाहिले. त्यानंतर दागिने ठेवलेले पाकीट आणि पैसे चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबतची माहिती वाहकाला देऊन किशोरी निकम यांनी एसटी पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितली. त्यानुसार एसटी कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. त्याठिकाणी पोलिसांनी एसटीतील सर्व प्रवाशांची झडती घेतली. मात्र, चोरीस गेलेले दागिने व रोकड सापडली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.