पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. या ठिकाणी धबधबे पाहण्यासाठो मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. मात्र, यामध्ये युवकांकडून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार केले जात असून अशा हुल्लडबाजांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, सडावाघापूर मार्गावर वाहतुकीचे नियम मोडून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर उंब्रज पोलिसांकडून कारवाई बडगा उगारण्यात आला. पोलिसांनी अशा २९ वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून २० हजार ४०० रुपयांचा दंड जमा केला.
पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झाला असून, तो पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची पावले सडावाघापूरकडे वळू लागली आहे. या ठिकाणी येणारे बहुतांश पर्यटक वाहतूक नियमावलीचे पालन करतात. मात्र, काही जण नियम मोडून हुल्लडबाजी करत असतात. अशा बेशिस्त पर्यटकांच्या हुल्लडबाजीवर अंकुश लावण्यासाठी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, हवालदार अमृत आळंदे, संजय धुमाळ, कॉन्स्टेबल हेमंत पाटील, विशाल अवघडे, वरिष्ठ पलटन नायक प्रभारी अधिकारी अभिजित पाटील, विजय खडके यांच्या पथकाने कारवाई हाती घेतली आहे.
या पथकाने तारळे दूरक्षेत्र हद्दीत सडावाघापूर रोड बादवाट येथे नाकाबंदी करून २९ वाहनांवर कारवाई करून २० हजार ४०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. सडा वाघापूर येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून कोणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी केले आहे.