सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रविवारी स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. पाटण विधानसभा मतदार संघात उध्दव ठाकरे तर कराड उत्तरमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. पाटण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) नेते उध्दव ठाकरे आणि कराड उत्तरमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रविवारी जाहीर सभा घेणार आहेत. उध्दव ठाकरे हे शंभूराज देसाईंच्या बंडखोरीचा कसा समाचार घेतात, याची जिल्ह्यात उत्सुकता आहे.
शंभूराज देसाईवर ठाकरेंचा राग
राज्यात २०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर शंभूराज देसाईंना गृहराज्यंत्रीपद मिळालं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसोबत शिवसेनेतून बाहेर पडत बंडखोरीचं निशान फडकवलं. या बंडामध्ये शंभूराज देसाई आपल्या पेक्षा दोन पावलं पुढे होते, अशी कबुली खुद्द एकनाथ शिंदेंनीच दिलेली आहे. त्यामळे शंभराजेंवर उध्दव ठाकरेंचा प्रचंड राग आहे.
पाटणमध्ये चुरशीची तिरंगी लढत
पाटण मतदार संघात पूर्वीपासून पाटणकर-देसाई यांच्यात पारंपारिक लढत होते. यंदा ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेला (उबाठा गट) गेल्यामुळ शंभूराज देसाईंचे पारंपारिक विरोधक असलेल्या पाटणकर गटाने बंडखोरी केली. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्या बंडखोरीमुळे पाटणमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.
गद्दारांना देऊ शिक्षा, निवडून आणू रिक्षा
सत्यजितसिंह पाटणकर याचे रिक्षा हे चिन्ह आहे. संपूर्ण मतदार संघात ते रिक्षा चालवत प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार चर्चेचा ठरला आहे. ‘गद्दारांना देऊ शिक्षा, निवडून आणू रिक्षा’, अशा टॅगलाईनखाली त्यांनी शंभूराज देसाईंना टार्गेट केलं आहे.