पाटण प्रतिनिधी | काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली. निवडून आल्यानंतर मात्र जनतेकडं साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या भाजप सरकारच्या हाती सत्ता देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, गुढे येथील संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
सत्तेत असताना धरणांची कामे का केली नाहीत
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात बोलताना उदयनराजे म्हणाले की, कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी मी केली होती. त्यानुसार हे महामंडळ स्थापन झालं. ढेबेवाडी खोऱ्यात असलेलं मराठवाडी धरण याच कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे अनेक वर्षे सत्ता असताना अशी कामे त्यांनी का मार्गी लावली नाहीत, असा सवाल उदयनराजेंनी केला.
पाटण मतदार संघातून मोठे मताधिक्क्य देणार
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. साताऱ्यासह राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली आहे. तरीही पाटण विधानसभा मतदारसंघातून उदयनराजेंना मोठे मताधिक्क्य देण्याचा शब्द आपण मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तो शब्द पाटणची जनता पूर्ण करेल.
लोक हितासाठी भाजपचे सरकार सत्तेवर आणा
पाटण, महाबळेश्वर, जावली हा संपूर्ण सह्याद्रीचा परिसर पर्यटनाच्या विकासातून प्रगती करू शकतो. हे लक्षात घेऊन पर्यटनावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आणण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा अर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकारला सत्तेवर आणण्याचे आवाहन खा. उदयनराजेंनी केलं.