सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यात अलीकडच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक अपघाताची घटना काल रविवारी कोरेगाव तालुक्यातील भोसे गावच्या परिसरातील कुमठे फाट्यावर घडली. अमावस्या असल्याने अमावास्येसाठी नारळ आणि फुले आणण्यासाठी दुचाकीवरून दोन कामगार कोरेगावला निघाले होते. नारळ आणि फुले घेऊन परतत असताना दोघं कामगारांचा कुमठे फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकी जागीच मृत्यू झाला.
आप्पालाल देशू चव्हाण (वय ५५, मूळ रा. कुडगी, ता. कोलार, जि. विजयपुर, राज्य कर्नाटक,, सध्या रा. भोसे, ता. कोरेगाव) व महादेव गौड (वय ७७) असे मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विहीर खुदाईचे काम करण्याच्या निमित्ताने आप्पालाल देशू चव्हाण (वय ५५, मूळ रा. कुडगी, ता. कोलार, जि. विजयपुर, राज्य कर्नाटक) हे आपल्या कुटुंबासह भोसे येथे रहात होते. त्यांच्यासह कामानिमित्ताने त्यांच्याच गावातील महादेव गौड (वय ७७) हेही रहात होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आप्पालाल हे आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक केए २८- एबी १३५०) महादेव यांना बरोबर घेऊन रविवारी अमावस्या असल्यामुळे नारळ आणि फुले आणण्यासाठी कोरेगावमध्ये आले होते.
कोरेगाव येथून नारळ, फुले आणि इतर साहित्य घेऊन ते रात्री साडेआठ- नऊ वाजता भोसे गावाकडे आपल्या मोटारसायकलवरून निघाले होते. त्यावेळी कुमठे फाट्यावर भगवा चौक कॅनॉलवर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्यामुळे ते दोघे जागीच पडून गंभीर जखमी झाले. त्यांची मोटारसायकलही मोडून पडली होती. त्यानंतर जखमी अवस्थेत आप्पालाल व महादेव यांना कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघाताची मृत आप्पालाल यांचे चिरंजीव आनंद आप्पालाल चव्हाण (वय ३७) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास कोरेगाव पोलिस करत आहेत.