मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन महिलांना मारहाण करून साडेसात तोळे दागिने लंपास

0
497
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील उंब्रज येथील अंधारवाडी रस्ता, तसेच शिवडे फाटा येथील सेवा रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत सुमारे सहा लाख ८० हजार रुपये किमतीचे साडेसात तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या दोन घटना गुरुवारी घडल्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तीन लाख रुपयांच्या चोरीची नोंद झाली असून महिलांच्या फिर्यादीवरून अज्ञातांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मनीषा शहाजी कदम (वय ४५, रा. उंब्रज, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या नेहमीप्रमाणे सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास मैत्रीण रोहिणी साळुंखे यांच्यासमवेत उंब्रज ते अंधारवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. त्यावेळी अंधारवाडी गावाच्या कमानीच्या अलीकडील वळणावर समोरून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून तीन अनोळखी व्यक्ती तोंडाला मास्क बांधून आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून तसेच मारहाण करून गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून घेऊन पोबारा केला. यावेळी त्यांनी आरडाओरडा करत असताना हाताच्या अंगठ्याला चाकू लागला.

दरम्यान, याचप्रकारे दुसरी घटना सात वाजण्याच्या सुमारास उंब्रज ते शिवडे सेवा रस्त्यावर घडली. अपूर्वा आकाश अर्जुगडे व सुनीता विजय अर्जुगडे या सासू, सून मॉर्निंग वॉकसाठी जाताना दोघींनाही दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. यात पोलिसांकडे तीन लाख रुपयांची नोंद केली आहे.

घटनेनंतर महिलांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे तपास करत आहेत.