कराड प्रतिनिधी | कराड – शेडगेवाडी या मार्गावर येळगाव फाटा येथे दुचाकी व सिलेंडरच्या ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाल्याच्या घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात पाचगणी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.
सुनिल श्रीमंत पाटील (वय 42, रा. पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली) असे ट्रक व दुचाकीच्या धडकेतील अपघातात ठार झालेल्याचे नांव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचगणी येथील असलेले सुनिल पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून कराड – चांदोली मार्गावरून सांगली जिल्ह्याच्या दिशेने निघाले होते. त्यांची दुचाकी येळगांव
फाट्यादरम्यान गवारकर वाडीच्या हद्दीत आली असता समोरून अचानक रत्नागिरीच्या दिशेने गॅस सिलेंडर भरून निघालेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
तर दुचाकीवरील सुनिल पाटील यांबा गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोन वाहनांच्या एकमेकावर आदळन्याचा आवाज इतका मोठा होता की लांबून येणाऱ्या वाहनांना एकु गेला. अपघाताची दुर्घटना घडताच दुचाकी स्वार व नागरिकांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेतली. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ कराड तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय पाटील घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळी असलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. या घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या अपघाताचा अधिक तपास पोलीस हवालदार सुनिल माने करीत आहेत.