मलकापुरात भरदिवसा दोघांनी धूम स्टाईलने वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | दुचाकीवरुन आलेल्या धुमस्टाईल चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे मंगळसूत्र लंपास केले. मलकापूर येथील यशवंतनगर सोसायटीत टपाल कार्यालयाजवळ शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत संध्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत मलकापूर येथील संध्या कुलकर्णी या शनिवारी सकाळी पायी चालत टपाल कार्यालयात निघाल्या होत्या. त्या यशवंतनगर सोसायटीत टपाल कार्यालयानजीक आल्या असताना एक दुचाकी त्यांच्याजवळून पुढे गेली. काही अंतरावरून ते दुचाकीस्वार माघारी वळले.

दुचाकी चालकाने हेल्मेट परिधान केले होते. तर पाठीमागे बसलेल्याने मास्क घातला होता. संध्या कुलकर्णी यांच्याजवळ आल्यानंतर पाठीमागे बसलेल्या युवकाने हिसडा मारुन त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे मंगळसुत्र हिसकावले. मंगळसुत्र हाताला लागताच ते चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. संध्या कुलकर्णी यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे नागरीक जमा झाले. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.