ओगलेवाडीत 110 तोळ्याच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लुटी प्रकरणी 24 तासात 2 संशयित ताब्यात, मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | ऐन दिवाळी सणात कराडजवळच्या ओगलेवाडी गावात बंद घर फोडून चोरट्यांनी ११० तोळे दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे ओगलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी चोवीस तासाच्या आत घरफोडीचा छडा लावत दोन संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे.

स्थानिक उद्योजकाच्या बंगल्यात चोरी

ज्या बंगल्यात चोरी झाली तो उद्योजक प्रतिक खाडे यांचा साई व्हिला बंगला कराड-विटा मार्गावर आहे. त्याच ठिकाणी त्यांचं वर्कशॉप आणि गारमेंटचा व्यवसायही आहे. प्रतिक हे आपली आई आणि पत्नीसह बंगल्यात राहतात. त्यांची आई जवळच असलेल्या आपल्या माहेरी गेल्या होत्या, तर लग्नानतरचा पहिला दिवाळ सण असल्यान प्रतिक हे पत्नीसह सासरवाडी सांगलीला गेले होते. सणानिमित्त सहा दिवस दोन्ही व्यवसायांना सुट्टी दिली होती.

घरफोडी आली वॉचमनच्या निदर्शनास

बंगल्यातील लाईट बंद करण्यासाठी गेल्यानंतर बंगल्याच्या वॉचमनला तिसऱ्या मजल्यावरील दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. वॉचमनने घटनेची माहिती प्रतिक खाडे यांना दिली. याची माहिती पोलिसांना समजताच डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वान तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं.

बंगल्याच्या पाठिमागून चोरट्यांचा प्रवेश

बंगल्याच्या समोर सुरक्षा रक्षकांची केबीन आहे. त्याठिकाणी रात्रपाळीचे सुरक्षा रक्षक होते. बंगल्याच्या पाठीमागील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याची खिडकी आणि गॅलरीतील रेलिंगला दोऱ्या बांधून चोरटे बंगल्यात घुसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ११० तोळे दागिणे आणि दीड लाखांची रोकड लंपास केली. या धाडसी घरफोडीमुळे आजुबाजूच्या नागरीकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दोन संशयित ताब्यात, मुद्देमाल हस्तगत

धाडसी घरफोडीनंतर स्थनिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने संयुक्त तपास करत चोवीस तासाच्या आत दोन संशयितांना ताब्यात घेतलं. दोन्ही संशयित सातारा जिल्ह्यातील पारधी समाजातील आहेत. मात्र, या गुन्ह्यात स्थानिकांचा सहभाग असावा, असाही संशय आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.