सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील धोम डावा कॅनॉलमध्ये हात बांधलेला आणि सडलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. कोणताही धागादोरा नसताना सातारा पोलिसांनी कौशल्याने तपास करत या खून प्रकरणाचा छडा लावला आहे. कानातील दागिन्याच्या हॉलमार्क वरून महिलेची ओळख पटवत पोलिसांनी दोघांना गजाआड केलं आहे. खून झालेली महिला मुंढेकरवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील आहे. सोबत राहण्याचा तगादा लावल्याने प्रियकराने मित्राच्या मदतीने तिचा गळा आवळून तिचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
रेवडी (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत मळवी नावाच्या शिवारानजीक धोम डावा कॅनॉलमध्ये एका अनोळखी महिलेचा हात बांधलेला, सडलेला मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच डीवायएसपी सोनाली कदम एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. घातपाताचा प्रकार असल्याने पोलिसांनी तपासाला तातडीने सुरुवात केली.
सडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मृतदेहाच्या अंगावरील कपडे, दागिन्याच्या वर्णनावरुन माहिती मिळवताना श्रीगोंदा येथे मिसींग दाखल असल्याचे समजले. श्रीगोंदा पोलिसांकडून मिळालेली माहिती मृत महिलेच्या वर्णनाशी जुळली. सुभद्रा राजेंद्र मुंढेकर (वय ४०, रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), असे खून झालेल्या महिलेचे नाव समोर आले.
पोलिसांनी तिच्या नातेवाईकांची संपर्क साधला असता मृत महिला दि.२८ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास राजेंद्र जगन्नाथ देशमुख (रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) नावच्या इसमासोबत निघून गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता संशयित हा गावातच असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत संशयिताने सांगितले की, मृत महिलेसोबत माझे प्रेमसंबंध होते. ती एकत्र राहण्याची जबरदस्ती करीत होती. म्हणून ३० मे रोजी माझा मित्र बिभीषन सुरेश चव्हाण (रा. बाभुळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्या टाटा सुमो गाडीतून आम्ही तिला गोवा येथे फिरायला घेवून गेलो होतो. २ जून रोजी गावी जाण्याचे ठरविल्यानंतर सुभद्राने ‘घरी जायचे नाही. मला तुझ्या सोबत रहायचे आहे’, असा तगदा लावला. राजेंद्र देशमुख त्याने आपला मित्र बिभीषन चव्हाण याचे सोबत तिचा काटा काढायचे ठरविले.
संशयित राजेंद्र देशमुख, त्याचा मित्र बिभीषन चव्हाण आणि मृत महिला सुभद्रा मुंढेकर हे ३ जून रोजी परत श्रीगोंद्याला निघाले. सायंकाळी ७.०० वा.च्या सुमारास रेवडी (ता. कोरेगाव) हद्दीत आल्यानंतर मित्र बिभीषन चव्हाणच्या मदतीने आपण सुभद्रा मुंढेकर हिचे हात बांधून, गळा आवळून तिचा खुन केला आणि मृतदेह धोम डावा कॅनॉलचे टाकून दिल, अशी कबुली त्याने दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.