सातारा प्रतिनिधी | इन्स्टाग्रामवरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणासोबत मैत्री केली, मैत्रीतून प्रेमसंबंध जुळले, त्यानंतर आरोपीने या तरुणीला शहरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केला आहे. त्याने या घटनेचा एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओच्या माध्यमातून आरोपीने मुलीवर आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शिवा दत्तात्रय सुकासे आणि विकास प्रकाश सुकासे अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका वसतिगृहात राहत असताना पीडित मुलीची २०२२ मध्ये शिवा सुकासे याच्यासोबत मैत्री झाली होती. मैत्रीचा फायदा घेऊन या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर शहरातील एका लॉजवर अत्याचार करण्यात आला. त्याचा व्हिडोओ देखील बनवण्यात आला.
1 जानेवारी रोजी शिवाचा भाऊ विकास तिला पळवून घेऊन गेला. मुलीच्या कुटुंबाने तक्रार केली. ती मागे घेण्यासाठी शिवा आणि त्याचा भाऊ विकासने मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकला. शिवा आणि मुलीचा अश्लील व्हिडीओ त्यांना पाठवला. घाबरलेल्या कुटुंबाने यावेळी पोलिसांकडे तक्रार केली नाही.
मात्र, त्यानंतरही शिवाने सातत्याने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले. त्रासाला कंटाळून अखेर मुलीने सातारा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.