पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, प्रकृती चिंताजनक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना विभागात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. शनिवार कोयनेच्या पश्चिमेकडील घाटमाथा परिसरात गवारेड्याच्या हल्ल्यात रुकसाना आयुब पटेल ही महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा गवारेड्याने संगमनगर (धक्का) येथील दोघांवर हल्ला केला आहे. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराडमधील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुभम रामचंद्र बाबर (वय १९) व सिताराम शिवराम सावंत (वय 47 रा, मनेरी, ता. पाटण), अशी जखमींची नावे आहेत. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न केल्याने वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शेतात शेळ्या चारावयास संगमनगर धक्का येथील शेतात गेलेल्याशुभम रामचंद्र बाबर याच्यावर दुपारी पावणे चारच्या सुमारास गवारेड्याने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. वनक्षेत्रपाल राजेश नलावडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यास 108 रुग्णवाहिकेतून पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. काही वेळानंतर गव्याने सिताराम शिवराम सावंत यांच्यावरही हल्ला केला. या घटनेची माहिती कोयनानगर पोलिसांना मिळताच हवालदार बोबडे यांनी पोलीस गाडीतून जखमीला पाटण ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकाच दिवसात गवारेड्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाल्याने दुर्गम भागातील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. या घटनेनंतर वन विभागाने जखमींवरील तातडीच्या उपचारासाठी २० हजार रुपयांची मदत दिली. या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले असून गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही त्याचा बंदोबस्त करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.