कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील जिंती एक थरारक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तींनी शुक्रवार दि. 30 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकींना आग लावली आहे. यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झालया आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जिंती येथील विकास सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी सावळा पाटील यांच्या घरासमोर शुक्रवारी रात्री दोन दुचाकी लावल्या होत्या. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञाताकडून पेट्रोल ओतून दुचाकी जाळण्यात आल्या. संचालक शिवाजी पाटील यांचे घर मुख्य चौकात असल्याने गाडीची पेट्रोल टाकी फुटल्याचा आवाज झाला. त्यामुळे घरातील व शेजारील लोक उठून बाहेर आले मात्र आगीने मोठा पेट घेतल्याने दुचाकी वाचवता आल्या नाहीत. दोन्ही दुचाकींचे फक्त सांगाडे उरले आहेत.
आकाश शिवाजी पाटील यांचे नावे असणारी (क्र. MH 50Q1330) हिरो होंडा व विठ्ठल सावळा पाटील हे वापरत असलेली त्याच्या नातेवाईक यांची (क्र. MH 50D2107) या दुचाकी आगीत जळून खाक झाल्य. या जळीतात सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असून या घटनेची फिर्याद आकाश शिवाजी पाटील यांनी कराड ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.