कराड प्रतिनिधी | कराड येथील बुधवार पेठेत एका तरुणाकडे खंडणीची मागणी करत त्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
किरण यमकर व महेश घाडगे(दोघेही रा. गुरुवार पेठ, कराड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड येथील आंबेडकर चौकमधील राहणारा चैतन्य महेंद्र लादे हा बुधवारपेठ येथील महालक्ष्मी लॉटरी सेंटर येथे उभा होता. त्यावेळी त्याठिकाणी किरण यमकर व महेश घाडगे हे दोघे आले. त्या दोघांनी चैतन्य याला ‘मी आता जेलमधून सुट्रन आलो आहे. तुझी कोण असतील तर त्यांना घेऊन ये, मी कोणाला भीत नाही, हा चौक माझा आहे, मी कराडचा भाई आहे, मला प्रत्येक महिन्याला तू हप्ता दिलाच पाहिजे,अशी खंडणीची मागणी केली.
तसेच या चौकात माझ्यावर आवाज चढवून कोणी बोलायचे नाही,” असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. त्यानंतर चैतन्य याच्या खिशातील १ हजार ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. या घडलेल्या प्रकारानंतर चैतन्य लादे याने थेट कराड शहर पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी किरण यमकर व महेश घाडगे या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ट पोलिस निरीक्षक कोंडीराम पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.