कराड प्रतिनिधी । कराड येथील शिंदे मळ्यातील डॉक्टर शिंदेंच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून सुमारे 46 लाख 20 हजारांचे सोन्याचे दागिने व रक्कम घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान टोळीतील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कुलदीप सिंग व साका सिंग अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. मुख्य सूत्रधारासह इतर दरोडेखोरांचा शोध अद्याप सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील शिंदे मळा येथे डॉ. राजेश शिंदे व त्यांच्या पत्नी पुजा शिंदे गेली अनेक वर्षांपासून इतर डॉक्टर व कर्मचारी स्टाफच्या मदतीने होलीस्टींग हिलिंग सेंटर चालवतात. या सेंटरच्या पाठीमागेच त्यांचा बंगला आहे. दरम्यान डॉ. राजेश शिंदे यांच्यावरील वैद्यकीय उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने त्यांनी हळूहळू पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या सेंटरमधून मिळालेली रक्कम व नातेवाईकांकडून आणलेली रक्कम असे सुमारे 27 लाखांची रोकड त्यांनी बंगल्यामध्येच ठेवली होती. तर इतर दागिनेही बंगल्यामध्येच होते.
दरम्यान, या बंगल्यावर सोमवार दि. 10 रोजी पहाटेच्या सुमारास सहा ते सात जणांच्या टोळीने दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुरा व चाकूचा धाक दाखवत 27 लाखांची रोकड व 48 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 46 लाख 20 हजारांच्या ऐवजा चोरून नेला होता. दरोडेखोरांनी कारमधून मुंबईकडे पलायन केल्याची माहिती मिळताच पोलिसांची पाच पथके तयार करून दरोडेखोरांच्या तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका दरोडेखोराला अंबरनाथ येथे ताब्यात घेऊन दोन दिवसांपूर्वी अटक केली होती.
तर आणखी एका संशयितास रविवारी पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. दोघांनाही सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, डॉक्टरांच्या बंगल्यावर टाकलेला दरोडा हा सहा महिने ते वर्षभर रेकी करून टाकला असावा , असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी तपासासाठी राज्यात ठिकठिकाणी पथके रवाना केली होती. त्यामध्ये पोलिसांनी एकास अंबरनाथ व दुसर्यास पुणे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस मुख्य सूत्रधारासह इतर दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.