पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील नवारस्ता येथील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात मल्हारपेठ पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या दोघांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजेंद्र शंकर डोंगळे व रोहित राजेंद्र डोंगळे (दोघेही रा. नवारस्ता, ता. पाटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मल्हारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन सर्जेराव शिर्के (रा. अडूळ, ता. पाटण) यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
फिर्यादीत म्हटले होते, की नवारस्ता येथील राजेंद्र शंकर डोंगरे, सूरज राजेंद्र डोंगरे व रोहित राजेंद्र डोंगरे यांनी संगनमत करून शेअर मार्केटविषयी मला माहिती दिली होती. त्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्याचे सांगून त्यातून भरपूर परतावा देण्याचे आमिष त्यांनी मला दाखवले होते. त्यांनी माझ्याकडून ऑनलाईन पद्धतीने नऊ लाख रुपये व रोख स्वरूपात तीन लाख रुपये असे एकूण १२ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी तीन लाख रुपये त्यांनी परत केले असून उर्वरित नऊ लाख रुपयांची माझी आर्थिक फसवणूक झाली असल्याचे म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंदवून राजेंद्र डोंगळे व रोहित डोंगळे यांना अटक केली. त्यांना शुक्रवारी पाटण न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सूरज डोंगरे पोलिसांना अद्याप मिळून आलेला नाही. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले करत आहेत.