कराड प्रतिनिधी | सध्या आयपीएल सुरू असून आयपीएलवर सट्टा लावण्याचे काम कराड शहरात होत आहे. दरम्यान, आयपीएलचा सट्टा लावणाऱ्या दोघांना कराड शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. संबंधितांकडून या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, साखळीच्या शोधासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना झाले आहे.
संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासाहेब कटरे (दोघेही रा. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून कराड शहरात होत आहे. वेळोवेळी पोलिसांनी या सट्टेबाजांवर कारवाई केली आहे, तरीही आयपीएल सुरू होताच शहरात सट्टा लावण्याचे प्रकार घडत आहेत.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशी अंती पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली असून पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. मुंबईत कराड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांचे पथक दाखल झाले असून त्यांच्याकडून मुंबईतील ठिकठिकाणी छापा टाकत तपास केला जात आहे.