कराड प्रतिनिधी | कराड-चिपळूण मार्गावर वारूंजी गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. निखील हणमंत जाधव (वय 19, रा. म्होप्रे, ता. कराड) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील म्होप्रे येथील युवक निखील जाधव हा कराड बाजूकडून म्होप्रे आपल्या गावी गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी कराड बाजूकडून पाटणच्या बाजूला निघालेल्या ट्रकने वारूंजी गावच्या हद्दीत खुशबू हॉटेलच्या समोरील डिव्हाडरपासून यु टर्न घेत होता. यावेळी पाठीमागून आलेली निखीलची दुचाकी आणि ट्रक यामध्ये अपघात झाला. या अपघातात निखील दुचाकीसह ट्रकच्या खाली सापडला. यामध्ये निखीलच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे ट्रकचालकाने ट्रक सोडून पलायन केले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती कराड शहर पोलिस ठाण्याला मिळताच अपघात विभागाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.