पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील सळवे, ढेबेवाडी, पाटण मार्गावर जानुगडेवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी पाटण आगार बसचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 30 जण जखमी झाले असून जखमींना कराड व ढेबेवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाकडून डॉक्टरांच्या वतीने जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार त्वरीत सुरु करण्याते आले आहेत. दरम्यान, ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, महसूल प्रशासनाचे सर्कल यांनी स्वत:भेट घेऊन विचारपासून केली व तात्काळ उपचार उपलब्ध होतील याची दक्षता घेतली तर कराड येथील विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी देखील कृष्णा हॉस्पिटल मध्ये भेट देऊन याबाबत रुग्णाची विचारपूस केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण डेपोची एसटी बस (एमएच-14 बी.टी.1127) सळवे येथून पाटणकडे निघाली होती. दरम्यान, जानुगडेवाडीनजीक कराड कडून येणारी खासगी प्रवासी बस अचानकपणे समोरुन भरधाव वेगाने आल्याने बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर धडकली. यामध्ये बस चालकासह तीसजण जखमी झाले.तसेच बसचे नुकसान झाले. यातील बहुतांश जणांना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले. त्यापैकी 9 जणांना कराड येथे व 9 जखमी प्रवाशांना स्थानिक ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
या घटनेची माहिती पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांना समजली. त्यानंतर त्यांनी प्रशासनास निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची विचारपूस केली. त्यांचे उपचाराबाबत स्थानिक डॉक्टरांना सूचना केल्या. तसेच तत्काळ 9 प्रवाशांवर उपचार करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली असून यातील किरकोळ स्वरुपाच्या जखमींना उपचारानंतर लगेच घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत दोन जण कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्यांचेवर पुढील उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
अशी आहेत जखमींची नावे
जखमींमध्ये चालक आरिफ निजाम मुल्ला (वय-५७ रा. कोळे), वाहक आर. एम. काळे (५७ रा.मालदन), सरिता धनाजी जाधव (वय ५३) सीताबाई नायकु मगरे (६१) रंजना सुरेश मगरे (५८) बाळाबाई शिवाजी मगरे (५८) शोभा भगवान मगरे (५०) निर्मला अशोक मगरे (४२) शोभा परशुराम जाधव (६५) शारदा सोनवणे (५०) छाया तानाजी जाधव (४४) धनाजी अंतू जाधव (५८, सर्व रा. सणबूर ता.पाटण), तुकाराम ज्ञानू भाईगडे (५९), तुकाराम गणपती यादव (५०) संपदा हनुमंत पुजारी (५०), शारदा सुरेश परीट (५०), यश जालिंदर बोरगे (१७) रोहिणी राजाराम गुरव (सर्व रा. सळवे), जिजाबाई जयसिंग चोरगे (७०), सुमन वसंत चोरगे (६०, सर्व रा. शिंदेवाडी), कमल शिवाजी जगदाळे (६०), बाळू नाना साळुंखे (५६), पल्लवी सुमित पवार (२६), सीताबाई वसंत लोहार (५०), श्रावणी सतीश पाटील (१५), आराध्या सतीश पाटील (१३), प्रगती रवींद्र पाटील (१५), समर्थ विक्रम जगदाळे (१९, सर्व रा. बनपुरी) मालन बाळासो साळुंखे (६४), जया बाळासाहेब साळुंखे (६८ सर्व रा. महिंद) यांचा समावेश आहे.