कराड प्रतिनिधी | कराड तालुक्याच्या पश्चिमेकडे टोकावर असलेल्या पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बुधवारी दुपारी थरारक घटना घडली. शेतात काम करत असलेल्या गमेवाडी गावातील शेतकऱ्यावर बिबट्याने पाठीमागून अचानक हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता वन विभागाने डोंगराच्या पायथ्याला ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
पाठरवाडी डोंगराच्या परिसरात कोणकोणत्या वन्य प्राण्यांचा वावर आहे. तसेच बिबट्यांची संख्या किती आहे, हे लक्षात येण्यासाठी वन विभागाने डोंगर पायथ्याच्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. कॅमेऱ्यांमध्ये अद्याट कुठल्याही वन्य प्राण्यांचे टिपले गेलेले नाही. मात्र, पुढील काही दिवस कॅमेरे लावून ठेवले जाणार आहेत.
शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत
पोपट जाधव हे शेतातील वानरांना हुसकावून लावण्यासाठी गेले होते. बिबट्या वानरांच्या मागावर आला होता. शेताच्या शेजारी असलेल्या ओढ्यातून अचानक वर आलेल्या बिबट्याने पोपट जाधव यांच्या अंगावर पाठीमागून झेप घेतली. या घटनेमुळे शेतकरी डोंगर पायथ्याशी असलेल्या शेतात जायला घाबरत आहेत.
वन विभागाकडून तातडीने हालचाली
बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने वन विभागाने त्याची तातडीने दखल घेत हालचाली सुरू केल्या. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी डोंगर पायथ्याच्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्यांच्या हालचाली आणि संख्येवर लक्ष ठेवले आहे.
बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना
गमेवाडीतील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे. काही वर्षापुर्वी शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावरही असाच बिबट्याने हल्ला केला होता. त्यातून तोही बालंबाल बचावला होता. गमेवाडी हे गाव डोंगराच्या पायथ्याला असल्याने वन्य प्राण्यांचा वावर आढळून येतो. रानडुकरे, वानरे या सारखे भक्ष्याची शिकार मिळत असल्याने बिबट्याचा गमेवाडी, पाठरवाडी भागात वावर आढळून येतो.