सातारा प्रतिनिधी | शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. वाईच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे.
यावेळी राज्यातील कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणा-या खासगी कंपन्या, संस्था. कृषी विभागाची विविध प्रक्षेत्रे, कृषी विज्ञान केंद्रे, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर व भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत संशोधन संस्था यासारख्या संस्थांमध्ये जाऊन नवनवीन शोध, प्रगत तंत्रज्ञान, विविध पीक पद्धती, आधुनिक शेतीबाबतची माहिती घेता येणार आहे.
प्रक्षेत्र प्रशिक्षणाचा पहिला दिवस पाडेगावचे ऊस संशोधन केंद्र, फळांचे गाव धुमाळवाडी, फलटणमधील के. बी. एक्स्पोर्ट कंपनी, दुसरा दिवस- बारामती कृषी विज्ञान केंद्र, माळेगावची राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, तिसरा दिवस- शाश्वत शेती, सेंद्रीय शेती १० ड्रम थेरी नारायणगाव, कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर. चौथा दिवस- तळेगाव दाभाडेचे राष्ट्रीय सुगी पश्चात केंद्र, वडगाव मावळचे भात संशोधन केंद्र, गणेशखिंड पुणेचे फळ संशोधन केंद्र , पाचवा दिवस- पुण्याचे पुष्प संशोधन संचालनालय, पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचा आळिंबी प्रकल्प, सासवडचे अंजीर व सिताफळ संशोधन केंद्र असे नियोजन आहे. उपविभागातून १८ ते ६५ वयोगटातील ३० लाभार्थीची निवड केली जाणार आहे.
अर्ज संख्या जास्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड केली जाणार आहे. त्यानुसार ज्येष्ठता सूची तयार करण्यात येईल. अर्ज करण्यासंदर्भात व योजनाबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.