तासाभरातच पावसानं कराडकरांची उडवली दैना; कुठे नाले तुंबले तर कुठे वाहतूक खोळंबली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणेशोत्सवापासून सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसापासून पाऊस चांगलाच कोसळत आहे. दरम्यान, आज शनिवारी दुपारनंतर तासभर पडलेल्या पावसाने कराड शहराला चांगले झोडपून काढले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. तर पावसामुळे शहरातील भाजी विक्रेत्यांसह सर्वांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड- मलकापूर हद्दीत उड्डाणपुलाचे काम चालले असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

कराड शहराला शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस दिवसभरात अधूनमधून पाऊस झोडपून काढत आहे. तासभर कोसळून शहरात पाणीच पाणी करीत आहे. या पावसामुळे शहरातील विदुत पुरवठा देखील काही वेळेसाठी बंद केला जात आहे. दरम्यान, आज शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. या याठिकाणी उड्डाणपुलाचे काम केले जात असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम देखील करण्यात आले आहे.

मॉन्सून परतीचा प्रवास सुरू असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार वादळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आज शनिवार, दि. ३० पर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविले आहेत. तर आतापर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

पाऊस न पडल्यास होणार अवघड परिस्थिती…

पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. यातील बलकवडी आणि तारळी ही धरणेच भरल्यात जमा आहेत. तर इतर धरणांत ६० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा झालेला आहे. आता पाऊस झाल्यास ही धरणे भरणार आहेत. अन्यथा धरणे भरणे शक्य नाही. त्यातच कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण, धरण भरण्यासाठी अजून १२ टीएमसीवर पाण्याची गरज आहे. तर उरमोडी धरणातून जिल्ह्याच्या पूर्व भागात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. सध्या हे धरण ६० टक्केही भरलेले नाही. त्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे.

कराड पालिका कर्मचारी ऑनड्यूटी

कराड शहरात मुसळधार पाऊस पडला कि शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. अनेक ठिकाणी गटाराचे पाणी साचून ते रस्त्यावर येते. त्यामुळे त्या गटारामधील मैलाही रस्त्यावर पसरतो. ज्या भागातील पाणी कमी होईल, तसा त्या परिसरातील रस्त्यांची सफाई, गटाराची सफाई करण्याची कार्यवाही पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. कराड शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचते. त्यावेळी पालिका कर्मचारी काही तासात दाखल होऊन विदुत मोटारीच्या साह्याने तेथील पाणी काढतात. तसेच ड्रेनेज तुंबले असल्यास त्यातील मैलाही काढण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांना “ऑन ड्युटी, चोवीस तास” कार्यरत राहावे लागते.

पावसामुळे वातावरणात झाला गारवा

सातारा जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरिपातील पिकांची अवस्था दयनीय बनत चालली असताना सुरुवातीला मंगळवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाळा सुरुवात झाली. दरम्यान, आज सकाळपासूनच शहरात उकाडा जाणवत होता. दुपारी आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

रस्त्यावरून वाहिले पाण्याचे लोट

शनिवारी दुपारी पडलेल्या पावसाचा जोर एवढा होता की शहरातील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहिले. तसेच गटारेही तुडुंब भरून वाहिली. चार चाकी वाहने वगळता रस्त्यावरील दुचाकी आणि नागरिकांची वर्दळ पूर्णपणे थांबली होती. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

4 महिन्यांत नवजाला साडेपाच हजार मिलीमीटर पर्जन्यमान

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असली तरी चार महिन्यात नवजा येथे तब्बल साडे पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरच्या पावसानेही ५ हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. कोयना परिसरात पाऊस कमी जास्त प्रमाणात पडत असून धरणातील पाणीसाठा ९२ टीएमसीच्यावर गेला आहे. सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस होतो. याकाळात पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, तापोळा, महाबळेश्वर या भागात तुफान वृष्टी होते. त्यामुळे येथील पाऊस पाच-सहा हजार मिलीमीटरचा टप्पा पार करतो. मात्र, यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धरणात पाण्याची आवाक कमी झाली आहे.

उद्या ढगफुटीचा डख यांचा अंदाज

राज्यात 19 सप्टेंबर पासून अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण गणेशोत्सव मुसळधार पावसाने गजबजून उठला. आता आज आणि उद्या राज्यातील सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, पंढरपूर, अकलूज, विटा, जत, कर्नाटक, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, महाबळेश्वर, लातूर या भागात ढगफुटी सारखा पाऊस पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामानातज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.