सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा घाट म्हणून खंबाटकी घाटाकडे पाहिले जाते. मात्र, घाटात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असते. आज खंबाटकी घाटात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना घडली. त्यामुळे अनेक वाहनांची घसरगुंडी झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ऑईलमुळे गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले.
शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने पुणे-मुंबई वरून गावाकडे तसेच महाबळेश्वर, पाचगणीकडे येणाऱ्यांची संख्या आज जास्त वाढली आहे. दरम्यान, आज पहाटे खंबाटकी घाटातील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या वळणावर एका गाडीतील ऑइल किमान 100 मीटर अंतरावर पसरले. वळणावर ऑइल पसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली तसेच काही गाड्या घसरून कठड्यास धडकल्या. यामध्ये गाडींचे किरकोळ नुकसान झाले.
दरम्यान, याबाबतची माहिती नागरिकांनी महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि घाटातील वाहतूक सिंगल लेनवरून सुरू केली. तसेच खंडाळा शहरातील टॅंकर व अग्निशामक यंत्रणाद्वारे रस्त्यावर पाणी मारण्यात आले. यानंतर दुपारी या महामार्गावर माती टाकून रस्ता साफ करण्याचे काम सुरू होते. या घाटात सकाळपासून सिंगल लेन वाहतूक सुरळीतपणे सुरू असून ऑईल सांडल्यामुळे वाहने धीम्या गतीने चालली आहेत.