पाटण प्रतिनिधी । पवनचक्कीची गरगर फिरणारी पाती, बाजूने हिरवेगार डोंगर आणि या डोंगराच्या कुशीत असलेले वांग-मराठवाडी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून, वांग-मराठवाडी धरण पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. धरण परिसरातील व्यवसायांना त्यामुळे तेजी प्राप्त झाली असून पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
एका बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला पवनऊर्जा कंपनीची गरगर फिरणारी पाती, अशा नयनरम्य परिसरात निसर्गाच्या कोंदणात साकारलेले वांग-मराठवाडी धरण सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. या धरणाच्या कामाला वर्ष १९९७ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर अनेक वर्षे वेगवेगळ्या कारणांनी धरणाचे काम रखडत गेले. कधी धरणग्रस्तांची आंदोलने, तर कधी निधीचा तुटवडा. त्यामुळे धरणाच्या कामाला कधी गती मिळालीच नाही. वर्ष २०१२ पासून धरणाच्या जलाशयात थोडाफार पाणीसाठा करण्यासाठी सुरुवात केली. मात्र, धरणाचे काम अपूर्णच होते.
पुढे वांग-मराठवाडी धरण प्रकल्प प्रधानमंत्री सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे धरणाच्या कामाला पुन्हा गती प्राप्त झाली. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने धरणात पाणीसाठा तुडुंब आहे. धरण पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून, विभागात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.
श्रीक्षेत्र नाईकबा, श्रीक्षेत्र वाल्मीकचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक व पर्यटक भोसगाव येथील फुलपाखरू उद्यान पाहिल्यावर वांग-मराठवाडी धरण पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे वांग-मराठवाडी धरण पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले तिकडे वळायला लागली आहेत.
जलाशयात बोटिंग व मच्छिमारी सुरू करण्याची मागणी
वांग-मराठवाडी धरण परिसरातील हॉटेल व्यवसायासह इतर व्यवसायांना तेजी प्राप्त झाली आहे. त्यामुळे इथे जमिनीचे भावही गगनाला भिडू लागले आहेत. वांग-मराठवाडी जलाशयात बोटिंग व मच्छिमारी व्यवसाय सुरू झाल्यास पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. शासनाने त्याअनुषंगाने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.