पर्यटन मंत्री शंभुराज देसाई मिलिटरी अपशिंगे गावास देणार भेट; प्रतापगडाची अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी

0
1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पर्यटन, खाणीकर्म, माजी सैनिक कल्याणचे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आज दाखल झाले. यावेळी कराड येथील पाटण टिकाटने या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करीत स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. त्यामुळे जागतिक पर्यटन तज्ञांची मदत घेऊन महाराष्ट्राचा नव्याने पर्यटन विकास आराखडा तयार करणार आहे. त्या आराखड्यानुसार महाराष्ट्राला पर्यटनात देशात एक नंबर राज्य करणार आहे. तसेच उद्या मिलिटरी अपशिंगे या गावास अधिकाऱ्यांसमवेत भेट देणार असून बुधवारी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रतापगडची पाहणी करणार असल्याची माहिती दिली आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज कराड येथे दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज प्रथमच मंत्रीपद स्वीकारल्यानंतर सातारा जिल्ह्यात आणि माझा मतदार संघ असलेल्या पाटण तालुक्यात मी येत आहे. मला एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली आहे. माझ्याकडे पर्यटन, खाणीकर्म, माजी सैनिक कल्याण याचा पदभार असून या सगळ्या विभागांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

सातारा जिल्हा हा माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे या गावात प्रत्येक घरटी एकादा दुसरा माणूस सैन्य दलात काम करतो. उद्या मंगळवार दि. २४ रोजी मी अधिकाऱ्यांसमवेत मिलिटरी अपशिंगे गावाला भेट देणार असून त्या गावाच्या विकासासाठी वेगळे काय करता येईल याचा आराखडा तयार करणार आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा ऐतिहासिक गड असून गड संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्रतापगड चा आराखडा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच तयार केला आहे. त्याला काही प्रमाणात निधी दिला आहे. त्याचा दुसरा टप्पा मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून बुधवारी दि. २५ रोजी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रतापगडची पाहणी करणार असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी म्हंटले.