सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या चार मंत्री असल्याने आता विकासकामी झपाट्याने होत आहेत. या मंत्र्यांकडून सतरा जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. या दरम्यान, निसर्गरम्य कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य शासनाकडून मोठे प्रयत्न सुरू असून पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कोयनानगर येथे दोन मोठे बहुउद्देशीय प्रकल्प प्रस्तावित आहेत. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे हे दोन्ही ड्रीम प्रोजेक्ट असून पर्यटनवाढीसाठी माईलस्टोन ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या उभारणीनंतर कोयना पर्यटन अल्पावधीतच जागतिक पर्यटन क्षेत्राच्या क्रमवारीत नंबर वन होणार आहे.
सातारा जिल्ह्यास पर्यटनमंत्री म्हणून शंभूराज देसाई, बांधकाममंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे हे राज्याचे काम पाहत आहेत. तर त्यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील असल्याने त्यांनी सातारा जिल्ह्यात अलीकडे पर्यटन वाढीच्या दृष्टीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
सातारा जिल्ह्यात विशेष करून पर्यटकांना ओझर्डे धबधबा अधिक जवळून अनुभवता यावा यासाठी येथे स्काय- वॉक प्रकल्प उभारला जाणार आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या बहुउद्देशीय प्रकल्पामुळे कोयना परिसराचा निसर्गसौंदर्याचा जागतिक स्तरावर विस्तार होण्याबाबत इच्छा मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. कोयना परिसराचा पर्यटन हब म्हणून विकास हा महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी मोठा टप्पा ठरणार आहे. वृंदावन गार्डन आणि स्काय-वॉकसारखे प्रकल्प पर्यटकांसाठी नवनवीन अनुभव देतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. या संकल्पनेतून पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी या मेगा प्रकल्पाची संकल्पना मांडली आहॆ.
स्काय-वॉक प्रकल्प
सातारा जिल्ह्यातील ओझर्डे धबधब्यावर प्रस्तावित स्काय- वॉक हा एक रोमांचक अनुभव ठरणार आहे. धबधब्यावरून चालत जाण्याची संधी पर्यटकांसाठी थरारक ठरेल आणि त्यांना निसर्ग अधिक जवळून अनुभवता येणार आहे.
वृंदावन गार्डन
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील नेहरू उद्यानात वृंदावन गार्डन उभारले जाणार आहे. या गार्डनमुळे कोयनानगरचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी आकर्षण निर्माण होईल आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.