कराड प्रतिनिधी | कराड परिसरात मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे कराड शहरातील असलेल्या दत्त चौकात मोठ्या होर्डिंगचा काही भाग कोसळला. यामध्ये दोन मुली थोडक्यात बचावल्या.
वातावरणात उकडा असताना मंगळवारी दुपारपासून अचानकी ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुसाट वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, यावेळी झालेल्या वादळी पावसात दत्त चौकातील सूर्या कॉम्लेक्सवरील लोखंडी होर्डिंगचा काही भाग तुटून रस्त्यावर कोसळला. यामध्ये सायकल वरून जाणार्या दोन मुली थोडक्यात बचावल्या. तरीही पडलेल्या होर्डिंगमध्ये अडकून त्या पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दुपारी चार -साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने कराड शहराबरोबर कार्वे, कोरेगाव, वडगाव, शेरे, दुशेरे, शेणोली, रेठरे कारखाना आदी भागात हजेरी लावली. तसेच मसूर पूर्व भागात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली.
कार्वे तालुका कराड परिसरात वादळी पावसाचा तडाखा
कार्वेसह गाव परिसरात अर्धा तास मुसळधार पावसाने शाळा शिवार जोडपून काढला. कराड तालुक्यासह कार्वे परिसरात सकाळपासून चार वाजेपर्यंत उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. दिवसभर ढगाळ हवामान दिसत होतं. उन्हामुळे चटके बसत होते. अचानक विजेचा कडकडाट मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली. वादळी वारे वाहू लागली सुमारे चारच्या दरम्यान बारीक रिमझिम पावसाचे आगमन सुरू झाले. दिवसभर वाढलेली उष्णता वाढलेले तापमान यामुळे शेतकरी शेतमजूर उष्णतेच्या तीव्रतेमुळे हैराण झाले होते. सुरू झालेल्या रिमझिम पावसातून वादळी पावसाने जोर धरला. अर्धा तास पावसाने सर्वत्र झोपून काढले. सारा शिवार थंडगार झाला. अचानक सुरू झालेल्या वादळी वारा पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच ज्वारी काढणे मळणीची सुगी सुरू असल्याने शेतकरी वादळी वारा पावसाने हवालदिन झाले आहेत.