कराडात संरक्षक भिंतीवरून वाद; दगडफेकीत तीन पोलिस किरकोळ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराडच्या शनिवार पेठेतील मक्का मशिदीलगत पोलीस दलाच्या जागेला संरक्षक भिंत उभारण्याच्या कामावेळी या जागेतून मशिदीत येण्या – जाण्याच्या रस्त्यावरून मुस्लीम समाज आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली. संरक्षक भिंत उभारण्याचे काम रोखण्याचा प्रयत्न मुस्लीम समाजातील युवक, महिलांनी केला. यावरून दुपारी गोंधळ उडाला. यावेळी किरकोळ दगडफेक आणि झटापट होऊन तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. परिणामी पोलिसांना काहिसा बळाचा वापर करावा लागला.

याबाबतची माहिती अशी की, शनिवार पेठेतील रेव्हिन्यू कॉलनीसमोर पोलीस प्रशासनाची जागा आहे. या जागेस संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. या जागेची रीतसर मोजणीही झाली. काल बुधवारी (दि. ५) कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सदरच्या कामास सुरुवात केली. यावेळी मुस्लीम समाजबांधवांनी रस्त्याच्या कारणावरून या कामास विरोध केला.

यावेळी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासोबत बैठकही झाली होती. सदर बैठकीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने काही अवधी मागून घेत सदरच्या कामास वरिष्ठ पातळीवरून स्थगितीचा आदेश आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शिष्टमंडळास या कामासाठी गुरुवारी बोलावले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी होम डीवायएसपी अतुल सबनीस यांना स्थळ पाहणी करण्यासाठी कराडला पाठवले होते.

याप्रश्नी गुरुवारी दुपारपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कोणतेही आदेश न आल्याने दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलीस प्रशासनाने पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने संरक्षक भिंतीच्या कामासाठी खोदकाम करण्यास सुरुवात केली.

यावेळी मुस्लीम समाजातील तरुण व लगतच्या दरवेशी वस्तीतील महिलांनी रस्त्याच्या प्रश्नावरून पोलिसांशी वाद घालत काम रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ वाढत गेला. तसेच किरकोळ दगडफेकही झाली. यामध्ये तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. या प्रकारावरून पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या काही युवकांसह महिलांनाही ताब्यात घेतले. सुमारे अर्धा तास गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी समाजातील काही लोकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

सायंकाळी साडपाचच्या सुमारास सातारा येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी बैठकीत चर्चा करायला गेलेले इसाक सवार, अल्ताफ शिकलगार, फारूक पटवेकर, मजहर कागदी, बरकत पटवेकर, साबीर मुल्ला यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आणि मुस्लीम समाजातील ज्येष्ठ मंडळी घटनास्थळी येत पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, के. एन. पाटील, अतुल सबनीस यांच्याशी चर्चा केली. तसेच सातारा येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी बैठकीत झालेली माहिती दिली. तसेच सदरच्या वादावर सुयोग्य तोडग्याची शक्यता असल्याने सरंक्षक भिंतीचा पाया काढण्याचे काम सुरु राहिले.