कराड प्रतिनिधी । कराड येथे गल्लोगल्ली भाईगिरी करणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. अशा भाईगिरी करणाऱ्यांना अधून मधून पोलिसांचा प्रसाद मिळत असतो. मात्र, त्यांच्यातील भाईगिरी काही कमी होताना दिसत नाही. किरकोळ पैशांसाठी अशा स्वयंघोषित भाईंकडून अनेकांना दम दिला जातोय. अशीच घटना कराडात नुकतीच घडली आहे. “आम्ही भाई आहोत,” असे म्हणत चाकूचा धाक दाखवून युवकाकडील १२०० रुपयांची रोकड तिघांनी लंपास केली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघाजनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल प्रताप पवार (रा. मंगळवार पेठ, कराड) याने याबाबतची फिर्यादी असून श्रीधर काशिनाथ थोरवडे (रा. बुधवार पेठ, कराड), शिवम रवींद्र क्षिरसागर (रा. विजयनगर, ता. कराड), गणेश कांबळे (रा. बुधवार पेठ, कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील मंगळवार पेठेत राहणारा राहुल पवार हा युवक सोमवारी रात्री घरामध्ये असताना साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे राहुल घराबाहेर आला. त्यावेळी श्रीधर थोरवडे, शिवम क्षीरसागर आणि गणेश कांबळे हे त्यांच्या कारजवळ उभे होते. राहुल त्यांच्याजवळ गेला असताना शिवम याने हातात चाकू घेऊन, श्रीधर थोरवडे हा बुधवार पेठेतील भाई आहे. “आम्ही कोणाला भीत नाही. तुला कराडात राहायचे आहे का?, तुला ठार मारून टाकेन आणि आम्हाला कोणी विचारणार नाही,” असे म्हणत राहुल याला धक्काबुक्की केली. त्याचवेळी शिवम याने राहुलच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेऊन त्यातील १ हजार २०० रुपये काढून घेतले.
गणेश कांबळे याने तेथे असलेली झाडाची कुंडी उचलून राहुल याला मारहाण केली. यावेळी आरडाओरडा झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. नागरिकांना पाहताच आरोपी तेथून पसार झाले. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.