कराड प्रतिनिधी | शेतीच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारी उत्तरमांड नदीपात्रातील विद्युत मोटर चोरी केल्याप्रकरणी पाटण तालुक्यातील माजगाव येथील तीन जणांना मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटर जप्त करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अजय बापूराव जाधव (वय ३३), पंकज सुनील पाटील (२७), संभाजी ऊर्फ गणेश शिवाजी भोसले (३४, सर्व रा. माजगाव, ता. पाटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत शकील अब्दुल मुल्ला (रा. गमेवाडी, ता. पाटण) यांनी फिर्याद दिली होती.
मल्हारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गमेवाडी गावच्या हद्दीतील गट नं. २९/५ मधील चिरखाणी नावाच्या शिवारात उत्तरमांड नदी पात्रात शेतीला पाणी पाजण्यासाठी ठेवलेली सुमारे १८ हजार रूपये किमतीची ५ एच.पी. क्षमतेची पाण्यातील इलेक्ट्रिक मोटार केबल कापून अज्ञात इसमाने चोरून नेली होती. याबाबतची फिर्याद शकील मुल्ला यांनी दिल्यानंतर मल्हारपेठ पालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी सपोनि चेतन मछले यांनी तत्काळ भेट देऊन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सूचना चाफळ दुरक्षेत्रातील पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत काही लोकांची माहिती प्राप्त झाली. त्यादृष्टीने संबंधित लोकांच्या हालचाली पडताळल्या. त्यामध्ये तीन इसमांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांना पोलिस ठाणे येथे आणून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्या बाबतची कबुली दिली. संशयित आरोपींच्या ताब्यातील पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर जप्त करुन त्यांना अटक करण्यात आली. सपोनि चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरिक्षक नितीश पोटे, रामराव वेताळ, पो.कॉ. सिद्धनाथ शेडगे आदींनी ही कारवाई केली.