सातारा प्रतिनिधी । शेत जमिनीतील माती तपासल्यानंतर अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार समतोल व योग्य प्रमाणात खताची मात्रा देऊन पीक उत्पादनात वाढ करता येते. यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे ठरत असून जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. २०२३-२४ वर्षात १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृद तपासणी केली आहे. तर साडेआठ हजार शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकांचे वाटप झाले आहे.
जमिनीचे अनेक प्रकार असतात. पण, या संबंधित जमीन कोणत्या पिकांसाठी अधिक उपयुक्त आहे हे पाहणे महत्त्वाचे असते. यासाठी मातीची तपासणी केल्यानंतर अनेक बाबी समजतात. जमिनीच्या आरोग्यपत्रिकेमुळे. मातीतील आम्लविम्ल निर्देशांक, क्षार, सेंद्रिय कर्ब, पालाश, नत्र, तांबे, लोह, जस्त, गंधक आदी घटकांचे प्रमाण स्पष्ट होते.
त्यानुसार शेतकऱ्यांना विविध उपाययोजना करणेही शक्य होते. त्याचबरोबर पिकांना कोणती खते द्यावीत, पिके काय घ्यावीत याबाबत सुस्पष्टता येते. तर माती परीक्षणानंतर पिकांचे उत्पादन वाढण्यास ही मदत होते. म्हणजे एकप्रकारे माती परीक्षण हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरते.
मातीची आरोग्यपत्रिका म्हणजे काय?
मृदा आरोग्य पत्रिकेमुळे जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक, क्षारता, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, स्फुरद, नत्र, तांबे, पालाश, जस्त, बोरॉन, गंधक आदी पिकाला आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. जमिनीच्या आरोग्याचे निदानासाठी माती परीक्षण आवश्यक आहे.
नमुना तपासणी शुल्क किती?
सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फुरद, पालाश आणि नत्र तपासणीसाठी ३५ रुपये शुल्क आकारले जाते. तर ३० दिवसांत आरोग्यपत्रिका दिली जाते. सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फूरद, पालाश, नत्र, लोह, तांबे, जस्त, बोरॉन आणि गंधक तपासणीसाठी २३५ रुपये शुल्क आकारले जाते.
वर्षातून एकदा माती परीक्षण हवं
आपण ज्या जमिनीतून पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता आहे, त्या मातीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत याची माहिती पाहिजे असेल तर किमान वर्षातून एकदा तरी परीक्षण करावे.
वर्षभरातील माती तपासणी अहवाल…
सातारा तालुक्यात १,७०९ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून १,६८९ आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यात १,४६३ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून १,३९७ आरोग्य पत्रिकांचे वाटप, खटाव तालुक्यात १,४३८ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून १,२९४ आरोग्य पत्रिकांचे वाटप, कराड तालुक्यात १,५९१ मृदांचे नमुने तपासले असून १,४६४ आरोग्य पत्रिकांचे वाटप, पाटण तालुक्यात १,४४४ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून १,४०२ आरोग्य पत्रिकांचे वाटप, वाई तालुक्यात १,७४३ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून १,६९० आरोग्य पत्रिकांचे वाटप, जावळी तालुक्यात ८९३ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून ८७४ आरोग्य पत्रिकांचे वाटप, खंडाळा तालुक्यात ६४३ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून ६४१ आरोग्य पत्रिकांचे वाटप, महाबळेश्वर तालुक्यात ६०१ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून ६०१ आरोग्य पत्रिकांचे वाटप, फलटण तालुक्यात १,०५६ मृदांचे नमुने तपासले असून १,०३८ आरोग्य पत्रिकांचे वाटप, माण तालुक्यात ५०४ मृदांचे नमुने तपासण्यात आले असून ५०४ आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.