सातारा प्रतिनिधी | शिरवळ ता. खंडाळा येथील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉक्टरांचे बंद घर भरदिवसा फोडत अज्ञात चोरट्यानी 4 लाख 32 हजार800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोम, ता. खंडाळा येथील डॉ. अभिनव दिलीप गायकवाड – पाटील हे आपल्या डॉक्टर पत्नीसमवेत शिरवळ येथील पळशी रोडवरील एका सोसायटीमध्ये राहण्यासाठी आले. दरम्यान, डॉ. अभिनव गायकवाड-पाटील यांचे संबंधित सोसायटीच्या खालील बाजूस स्वताःचे रुग्णालय आहे. तर पत्नी ही भोर, जि. पुणे याठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात नोकरीसाठी आहे. यावेळी डॉ. अभिनव गायकवाड-पाटील हे रुग्णालयातून दुपारी घरी गेले असता त्यांना घराचे दरवाजाचे कुलूप दिसले नाही.
यावेळी पाहणी केली असता दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी लॉकर, कपाटामधील 5.5 ग्रँम वजनाचे 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचे गंठण,1.25 ग्रँम वजनाचे 60 हजार रुपये किंमतीचे कानाचे वेल,1.5 ग्रँम वजनाचे सोन्याचे डायमंड प्लेटेड ब्रेसलेट 80 हजार रुपये किंमतीचे,17 हजार 800 रुपये रोख रक्कम असा 4 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान संबंधित चोरटा हा सोसायटीमधील सीसिटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेची शिरवळ पोलीस स्टेशनला डॉ. अभिनव गायकवाड-पाटील यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करीत आहे.